मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

मोठ्या बहिणीचा नवरा आणि धाकट्या बहिणीचा नवरा

डाउनलोड मोठ्या बहिणीचा नवरा आणि धाकट्या बहिणीचा नवरा

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘मोठ्या बहिणीचा नवरा’ आणि ‘धाकट्या बहिणीचा नवरा’ या दोन नातेवाचक शब्दांकरिता महाराष्ट्रातील विविध प्रदेशात पुढीलप्रमाणे शब्दवैविध्य दिसून येते.

मेव्हणा, म्हेवना, मेवना, मेवणा, मेव्हना, मेवनो, म्हेवने, मेहुना, म्हेऊना, मेवने, मेव्हने, मेहुने, मेव्हुना, मेव्हनं, मेव्हुने, धाकला मेवना, मोटा मेवना, म्हेवनं, मेऊने, मेवनं, मेहुनो, मोठा मेवना, मेव्हने, मेहनस, मेहनास, मेहवना, मोठा मेहना, मीहनास, मीहीनास, मिनस, मीहणास, मीनास, मीहीनासीस, म्हीनास, मेऊना, मेव्हनो, म्हेवनाले, मेवन भाऊ, भाऊजी, भाऊज़्ज़ा, भाओजी, भावजी, लाहान भाऊजी, मोठा भाऊजी, ल्हान भाऊजी, मोटे भाऊजी, लहान भाऊजी, मोठो भाओजी, न्हांगो भाओजी, भावोजी, छोटे भावोजी, मोठे भावोजी, भावज़ी, भाऊज़ी, भावजीस, धाकटे भाऊज़ी, थोरले भाऊज़ी, भाऊनी, भावास, भाऊजा, बडे भाई, भाईजान, भावो, भाओ, भावड, भावाडं, भाटव, भाटवे, भाटवाजी, भाटोजी, भाटो, भावं, दाजी, दादा, जीजु, दाज़ी, मामा, मोठे मामा, दाजीबा, साद्र्ळ्या, सादरमावा, साडू, जिज़ाजी, जिजाजी, कुन्यात, कुजात, बडे भाईजान, जाऊजी, ज़ावाजी, भाज़्ज़ान, भऊनई, ज़ावयजी, भाऊ, ज़ावई, कुयान, कुयाद, पावने, साडीन, बोहो, जिजा, जावाई, ज़ावाय, जावई, जमाई, बहनोई, ज़ावाईस, ज़ावाई, भाव, जावाय, बनवय, भावा, सोयरा, पाहुना, बेनोई, मेव्हणाले, म्हेवनाले, दुलभाई, मेहुणा, मोठा मेवना, लाहना मेवना, भाया, दीर, छोटे दाजी, मोटे दाजी, जिज़ो, पाओने, पाओना, बहिनोई, पाव्हना, बयनोयी, बईनोई, बयनोई, कवडसाब, बयनाई, भावनोई, पावना, पाहुना, जवाई, भेनोई, पंत, मेव्हणे, ज़वाई, दाजीस, मेहनवळी, भावड, मेहनवाळ, जवई, ज़वई, साला, जिज़्ज़ाजी, भऊआ, बव्वा, जवाय, पावद्या, पावडीहो, पावडी, बनोई, बन्ने बंधे, बंधे, बहेनोयी, भुआ, भेननोयी, बयनोयी, भेयनोयी, ज़वयी, ज़ावयभाऊ, बहीनज़वायी, बापु, जीज़ु, भाऊसासरा, भावसासरान, भईन ज़ावय, साळ भाऊ, ज़माई, बुवा, बाप्पु, भाटो, बहीनज़वई, ज़वय बापु, साया, साला, भाटवा, बहिनज़ावई, भाकेर, बहीनज़ावयी, बईनज़ावई, बहीनजवाई, भईनज़ावाई, साकीलभाऊ, सागीलभाऊ, भईनज़वाय, भईनज़ावाय, भईन ज़ावई, भई ज़ावय.

मेव्हणा हा शब्द मोठ्या बहिणीचा नवरा आणि धाकट्या बहिणीचा नवरासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जातो. म्हेवना, मेवना, मेवणा, मेव्हना, मेवनो, म्हेवने, मेहुना, म्हेऊना, मेवने, मेव्हने, मेव्हना, मेहुने, मेव्हुना, मेव्हनं, मेव्हुने, धाकला मेवना, मोटा मेवना, म्हेवनं, मेऊने, मेवनं, मेहुनो, मोठा मेवना, मेव्हने, मेहनस, मेहनास, मेहवना, मोठा मेहना, मीहनास, मीहीनास, मिनस, मीहणास, मीनास, मीहीनासीस, म्हिनास, मेऊना, मेहनास, मेव्हनो, मेव्हनाले, मेवन भाऊ, मेहनवळी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तसेच मेवनो हा शब्द कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात आढळून आलेला आहे. मेहनस, मेहनास, मेहनवळ, मेव्हनास, म्हिनास, मिहनास, मिहिनास, आणि मिहिनासीस हे शब्द रायगड, पालघर, ठाणे आणि पुणे या भौगोलिक प्रदेशातील आदिवासी समाजात आढळून येतात.

भाऊजी हा शब्द मोठ्या बहिणीचा नवरा आणि धाकट्या बहिणीचा नवरा या संकल्पनांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. भाऊज़्ज़ा, भाओजी, भावजी, लाहान भाऊजी, मोठा भाऊजी, ल्हान भाऊजी, मोटे भाऊजी, लहान भाऊजी, मोटो भाओजी, न्हांगो भाओजी, भावोजी, छोटे भावोजी, मोठे भावोजी, भावज़ी, भाऊज़ी, भावजीस, धाकटे भाऊज़ी, थोरले भाऊज़ी, भाऊनी, भावास, भाऊजा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भाऊज़्ज़ा हा शब्द कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड गावातील ख्रिश्चन समाजात आढळला आहे.

जावई या शब्दासाठी जाऊजी, ज़ावाजी, ज़ावयजी, ज़ावई, जावाई, ज़ावाय, ज़ावाई, जवाई, ज़वाई, जवई, ज़वई, जवाय, ज़वयी, ज़ावयभाऊ, बहीनज़वायी, बहीनज़वई, बहिनज़ावई, बहीनज़ावयी, बईनज़ावई, बहीनजवाई, भईनज़ावाई, भईनज़वाय, भईनज़ावाय, भईन ज़ावई, भई ज़ावय इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. ज़ावई, ज़वई, जवाई, ज़वयी, ज़वाई, ज़ावाई, जावाई, जावई, ज़ावाय इ. शब्द जळगाव, बुलढाणा, अकोला, अ‍मरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळून येतात. तसेच ज़ावयभाऊ, बहीनज़वायी, बहीनज़वई, बहिनज़ावई, बहीनज़ावयी, बईनज़ावई, बहीनजवाई, भईनज़ावाई, भईनज़वाय, भईनज़ावाय, भईन ज़ावई, भई ज़ावय हे शब्द विदर्भात आढळून येतात. भई ज़ावय हा शब्द चंद्रपूर जिल्ह्यातील दाताला या गावात आढळून आलेला आहे.

भाटवा हा शब्द प्रामुख्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आढळून येतो. भाटव, भाटवे, भाटवाजी, भाटोजी, भाटो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

भेनोई हा शब्द प्रामुख्याने नाशिक आणि वाशिम ह्या जिल्ह्यांमध्ये आढळतो. तसेच नंदुरबार, जळगाव, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बेनोई, बहनोई, बहिनोई, बनोई, बयनोयी, बईनोई, बयनोई, बयनाई, भावनोई, बहेनोयी, भेननोयी, बयनोयी, भेयनोयी, बहेनोयी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून येतात.

जीजु हा शब्द मोठ्या बहिणीचा नवरा आणि धाकट्या बहिणीचा नवरासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, नांदेड या जिह्यात आढळून येतो. जिज़ाजी, जिजाजी, जिज़ो, जिज़्ज़ाजी, जीज़ु, जिजा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

मेव्हना, दाजी, बहिनोई, भाऊजी, भाटवा, पाव्हना, जिजाजी, ज़ावई किंवा बहिनज़ावई, साला हे प्रमुख वैविध्य असून सदर शब्दांमध्ये वर नोंदविलेले वैविध्य आढळून येते. त्यापैकी भाऊजी आणि मेव्हणा हे नातेवाचक शब्द जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्हयात आढळून आले आहेत. कर्वे (१९५३:१६६) नुसार मेव्हणा आणि मेव्हणे या शब्दांचे मूळ संस्कृत भाषेत असून मैथूना/ मैथूनाका या शब्दापासून त्याची उत्पत्ती दर्शविली आहे. मैथूना/ मैथूनाका या शब्दाचे प्राकृतात मेहुणा किंवा मेहुणागा असे रूप झाले. वैदिक संस्कृत भाषेत सदर शब्दाला कोणताही नातेवाचक अर्थ नसून तो जोडीदर्शक आहे. लग्न इ. द्वारे जोडले जाणे किंवा संबंधित असणे असा या शब्दाचा अर्थ होतो. नंतर पुढे प्राकृतातून मराठीत मेहुणा जसाच्या तसा घेतला गेला. मराठीत मेहुणा शब्दाचा वापर फक्त मंगलकार्यासाठी बाहेर गावाहून बोलावण्यात आलेल्या विवाहित जोडप्यासाठी वापरला जात असे. संस्कृतात हा शब्द नपुसकलिंगी तर मराठीत तो पुल्लिंगी अहे. तसेच मराठीत मेव्हणा या शब्दाला नातेवाचक अर्थ आहे.

दाजीबा, साद्र्ळ्या, सादरमावा, दुलभाई, भाकेर, साकीलभाऊ, सागीलभाऊ हे नातेवाचक शब्द महाराष्ट्रातील सोलापूर, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, ग़ोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आढळतात.

संदर्भ:

कर्वे, इरावती १९५३, किनशिप ऑर्गनायज़ेशन इन इंडिया, डेक्कन कॉलेज मोनोग्राफ सिरिज: ११, पुणे
मोनियर विलियम्स (१८९९). “मैथुन”. अ संस्कृत –इंग्लिश डिक्शनरी. ऑक्सफोर्ड : द क्लॅरेनडॉन प्रेस.